पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, हे नाव एका विश्वा प्रमाणे आहे. या विश्वामध्ये अनेक पात्रे आहेत. या पात्रांच्या लकबी, त्यांची बोलण्याची शैली, त्यांची वागण्याची पद्धत, ही पात्र राहणारे पत्ते आणि अशा अनेक गोष्टींनी हे विश्व बनलेल आहे. ह्या विश्वामध्ये सखाराम गटनेचा भोळा भाबडापणा आहे आणि अंतु बर्वाच खोचकपणा ही आहे. पेस्तन काकांची निरागस मस्करी पण आहे आणि जेवताना प्रश्न विचारणाऱ्या काकांना उत्तर देणाऱ्या पुरुशोत्तमा ची तिरसट टिप्पणी पण आहे.
तुम्हाला या विश्वामध्ये कुठे निर-निराळ्या हौदांचे प्रश्न टाकणारे, मुलं ही शाळेत बडवण्यासाठी झालेली आहेत अशा निश्चयाचे शिक्षक सुद्धा भेटतील, तर कुठे तुम्हाला मुलांना सकाळी लवकर शिकवणी देणारे आणि सर्व कार्यांचा पाठपुरावा करून मुलांच्या मनात कायम छाप सोडणारे, चितळे मास्तर सुद्धा भेटतील. दिसला शब्द की तोड स्पेलिंगच्या कळ्या, असे शिक्षक जेव्हा ह्या विश्वामध्ये आपल्यासमोर येतात तेव्हा आपल्या बिगरी ते मॅट्रिक प्रवासाच्या आठवणीने हृदय भरून येते.
ह्या विश्वामध्ये प्रेमाचे अनेक छटा पण आहेत. रावसाहेबांच्या शिव्यांनी फोडणी दिलेले तिखट प्रेम आणि नारायण यांनी दुसऱ्यांना आपले आयुष्य पूर्णपणे समर्पित केलेलं प्रेम.
यामधल्या पुणेकर मुंबईकर आणि नागपूरकरांनी आपल्याला गुदगुल्या होतील असं हसवलं. वारंवार आपल्या बांधलेल्या घराचं कौतुक करणारे, सतत प्रवासाला जाऊन त्याच्या छायाचित्रांवर समालोचन करणारे, आपल्या पाळीव प्राण्याला मुलाप्रमाणे वाढवणारे, दुपारी साखर झोपे मध्ये फोन करणारे, अशा अनेक जनान वरील सूक्ष्म रागाला वाचा फोडली. इथेच तुम्हाला असे दुकानदार भेटतील, ज्यांच्या दुकानात सर्वात दुर्लक्षित होणारी वस्तू म्हणजे ग्राहक तर कुठे कुठल्यातरी साहेबांच्या ऑफिसात, रविवारची वाट पाहत आठवडा झिजवनारे मराठमोळे नोकर चाकर सुद्धा भेटतील. मग अशा रविवारी एखादा पाहुणा टपकला कि त्याचा अनावर होणाऱ्या संताप आपल्याला आपल्या “त्या” रविवारच्या आठवण देऊन जातो.
ह्या लोकांनी प्रमुख अध्यक्षांची काढलेली वाऱ्यावरची वरात असो किंवा कोर्टात दिलेली साक्ष असो किंवा चोरून कपडे वापरणारा नामू परीट असो; अहो व्यक्तीच काय अगदी रत्नागिरीहून मुंबईला जाणाऱ्या एसटी समोर गोंधळ घालणारी म्हस असो, सर्वकाही मनावरत छाप सोडून गेली आहे.
ह्या आणि अशा अनेक पात्रांत बरोबर मी मोठा झालो. साहेबांची मुंबई, साहेबांची ट्राम, ही जरी आम्ही प्रत्यक्ष पाहिली नसली तरी या विश्वामध्ये आम्ही अनुभवलेली आहे. इथेच आम्ही बटाट्याची चाळ ही पाहिली आणि अंधारामध्ये कडकट कडकट करणार पोस्ट ऑफिस पाहिल.
जरी पुण्यामध्ये वाढलो तरी पुलंनी दाखवलेलं पुणे वेगळाच होत.
बटाटाच्या चाळीतल्या लोकांच भ्रमण मंडळ जेव्हा पुण्यात येते तेव्हा त्यांना (न)दिसलेलं पुणे असो किंवा हरितात्या बरोबर पुण्याला येणाऱ्या लहानश्या पुरुषोत्तम च्या डोळ्यातलं पुणे असो. या विश्वात सर्व काही निराळे.
इतिहास प्रत्यक्ष दाखवणारे आणि पुराव्यानिशी शाबीत करीन असे म्हणणारे हरितात्यान सारखा आत्मविश्वास असणारा व्यक्ती, अजूनही मला प्रत्यक्ष जीवनात सापडलेला नाही.
या विश्वाचा धनी म्हणजे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. त्या नावाची ओळख मला खूप नंतर झाली परंतु ह्या पात्रां ची माझी सर्वात पहिल्यांदा जवळीक झाली होती. ह्या लोकांनी मला विनोदाशी मैत्री करून दिली. आणि ह्याच विनोदाने आयुष्यातले बरेचशे प्रसंग सुखकर केले. नाच रे मोरा ते एक ते विदूषक असा हा विलक्षण प्रवास असलेला माणूस. बर यांना फक्त लेखक म्हणावं तर तितक्याच ताकतीचे गीतकार, संगीतकार, दिग्दर्शक आणि बरेच काही गुणांनी श्रीमंत असलेला हा माणूस, याची शब्दांनी काय ओळख करून द्यावी. बर असं म्हणावं की हा फक्त काल्पनिक विश्वात रमतो तर त्यांची भाषणे ऐकावी.
याचं सावरकरांवरच भाषण अंतर्मुख करणारा आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शन वर दिलेल्या मुलाखती मध्ये, याच अलौकिक माणसाचा प्रांजळपणा दिसतो. जेव्हा आचार्य अत्रे पुलंच्या प्रयोगाला येतात, तेव्हा स्वतःला आलेल्या दडपणआची आणि नंतर मिळालेल्या कौतुकाच्या थापे ची याद राखून, जेव्हा स्वतः मच्छिंद्र कांबळे यांच्या वस्त्रहरण प्रयोगाला जातात व प्रयोगाच्या मध्यंतरात उत्स्फूर्त कौतुकाचं भाषण करतात, ह्या वरून या माणसाच्या मनाच्या श्रीमंतीची ओळख होते.
माझ्यासारखे अशा अनेक पुल वेडे कलाप्रेमी हे या माणसावर असिम भक्ती करतात आणि आमच्या या दैवताचा आज वाढदिवस.
यांची प्रत्येक कलाकृती मध्ये इतक सामर्थ्य आहे की त्याच्यामुळे प्रेक्षकांच्या मनात विलक्षण बदल घडू शकतो. असा हा अवलिया, आपल्याला प्रत्येक पात्रांमध्ये विदूषका सारखा गदगदवतो आणि अगदी शेवटच्या काही क्षणांमध्ये डोळे ओले करून जातो. या पिढीचा शल्य हे आहे की आपण यांना प्रत्यक्ष भेटलो नाही. पण हल्ली दूरचित्रवाणी आणि चित्रपट या मधला खालवलेला विनोदाचा दर्जा पाहता कदाचित पुल हयात नाहीयेत हेच बरं.