मला दिसलेली आज्जी

नऊवारी काष्टा नेसलेली, डोक्यावर पदर असलेली, कपाळावर गोल कुंकू असलेली, अशी ही आज्जी आम्हाला कायम आंगणात शांततेत वाट पाहत असलेली दिसायची. अगदी कोणीही यायच असो, मग नातू असो किंवा मुल, घरातील सर्व काही उरकून आज्जी अंगणात बसायची. जर मला उशीर झाला, मग तो पाच मिनिट असो किंवा तास भर, “का रे आज एवढा उशीर, मी एरभाळ झाली वाट बघततीये, लई तरास नाई झाला ना तुला” अशा शब्दांनी स्वागत व्हायचे. ह्या प्रश्नाचे उत्तर देतो ना देतो की लगेच पुढचा सवाल, “काय खाल्ल्यास का?”. गुडघ्या वरचा बेल्ट वर करतात, पाठीच्या बेल्ट चा पट्टा टाइट करत, आमची आज्जी लगबगीने स्वयंपाक घरात जायची पान वाढायला. तिझ ते चालणं सुद्धा विशेषच. गुढघयांनी तशी साथ थोडी लवकर च सोडली होती म्हणून भिंतीला धरत धरत हळू हळू चालत असे.

“काय आज्जी कशी काय तब्येत?” ह्या माझ्या प्रश्नाचं उत्तर हल्लीच्या काही वर्षांमध्ये “बरीच म्हणायची” असंच द्यायची. ” वया प्रमाणे तिरास होणार, आता काय करायच? आपला टाकटर ने दिली हायेत ओशाधा, बराय त्यांना.” मायेने पाठीवर हात फिरवत माझंच सांत्वन करायची.

मी आपला तिचं हे म्हणणं शांतपणे ऐकून घ्यायचो पण खरंतर मी तिने वाढलेल्या भाजीच्या एका एका घासाचा आस्वाद घेत आसे. जेवण बनवना ही कला आहे, हे माझ्या निरक्षर आजीने खुप लवकरच हेरलं होतं. काही मोजक्याच सामग्रीमध्ये अत्यंत चविष्ट आणि जिभेला चटका लागेल, असे होत माझ्या आजीच्या हातचा जेवण. कधी एखादा पदार्थ घरात नाही म्हणुन जेवणाची चव कधी खालवली नाही. आत्तापर्यंत मला असा एकही मनुष्य भेटला नाही ज्याने आजीच्या जेवणात काही कमतरता काढली. बर मनसोक्त कौतुक करावं तर आपलं ती म्हणायची, “शोभा च्या पोरांना काय बी वाडा, अगदी चटणी भाकर दिली तरी ग्वाडच.”

“अग आज्जी खरंच मस्तच झालिये चटणी” मी आपलं पुन्हा साक्ष देत बोट चाटत सांगे. आज्जी मात्र फक्तं दिलखुलास हसे. 

सर्वांच्या आवडी-निवडी ची कळजी घ्यायची आज्जी. आमच्यासाठी मटन तर आईसाठी तितक्यात तोडीची वांग्याची किंवा शेवग्याची भाजी. आज्जी चे इवलेसे हात पाय अजूनही आठवतात. कित्येक वेळा ती शांतपणे झोपाळ्यावर बसून फोनवर आमच्याशी बोलायची. प्रत्येक वेळी मायेने “कसा येस तू बाळा.. बरायाना?” आज्जी आजकल खूप उकडतंय अशी मी खंत व्यक्त करायचो. पण आजीचा तो स्वभावच नव्हता की कोणत्या गोष्टीची ती खंत करे. येऊन जाऊन मात्र तिची फक्त एकच खंत होती, “आज काल तू फोन नाही करत, माझं चुकलं, तुला करगोटा नाही बांधला न लहानपणी” असं म्हणून स्वतःच उत्तर देत खळखळून हसे. 

लहानपणी एकदा आपल्या नीरीच्या घरी शेवया बनवायचा कार्यक्रम होता. आज्जी ला मी मदत करत होतो. अगदी लहानपणापासून माझे हात खूप ताकतवान होते. ते पाहून मिस्किलपणे आजी बोलली की तू जर तुझ्या बायकोला एक फटका मारला तर ती काय उठणार नाही बरेच दिवस. “अग आज्जी फटका मारायचाच कशा ला?” असे पटकन तिला उत्तर दिल. त्या उत्तराला हसत हसत तिने माझ्या आईचे खूप कौतुक केले. ती म्हटली, “शोभा तुझी समदी महिनत हे पोरगं कामी लावणार” अशा तिच्या या निखळ कौतुकाच्या थापे पुढे कोणतही पुरस्कार पिका पडेल.

माझ्या आणि माझ्या मावशीच्या लहानपणापासून चालू असलेल्या भांडणांमध्ये, ती माझ्या बाजू घेणारी पंच होती. “ये आज्जी, काय संस्कार नाही केले नाही का तुझ्या लहान मुलीला” अशी मी माझ्या अन्यायाची तक्रार तिच्याकडे करे. 

” ये काय ग उट सुट त्या पोराच्या जीवाच्या माग, वाईच गप” अशी ती खनकुन माझ्या बाजूने निर्णय घ्यायची. मावशी जर आज्जीच्या जवळ असली तर एखादा फटका पडलाच समजायचा तिला. अशा या पंचाच्या जाण्यामुळे आमच्या भांडणाला मात्र कायमचा विराम पडनार.

स्मितहास्य, शांतपणे बोलन अशा समाजाच्या निरर्थक नियमावलीला न जुमानता, आपलं म्हणान ती स्पष्टपणे व्यक्त करे. वाघानीचा आवाज- खडक, ठळक आणि एक तारेचा. जे काही केलं ते हृदयातून. हसणार हृदयातून, बोलणं हृदयातून आणी ओरडणे सुद्धा. मिरचीचा ठेच्चा सारखी होती आज्जी. अत्यंत कडक पण त्याच्या शिवाय जेवणाला चव पण नव्हती. राग जरी आला तरी आपला तो त्या क्षणापुरता. पुढच्या क्षणी तितक्याच हक्कानी हाक मारायची. 

“माझी देव पूजा देव पूजा” भक्तीचे हे तिचे स्वर आज अजरामर झाले आहेत. देवावर, माणसांवर, प्राण्यावर अगदी झाडा वर सुद्धा मनापासून प्रेम करत असे माझी आज्जी. जेव्हा टायगर नावाचा कुत्रा आजारी होता, तेव्हा तो फक्त आज्जी लाच लावून दायचा. देवावरच्या श्रद्धे प्रमाणेच स्वच्छता व टापटीपपणा वर आज्जी ची असीम श्रद्धा. 

तिच्या याच श्रद्धेच फळ म्हणून निसर्ग दैवतेने, निरेचे घर सुंदर केले आहे. चिकू, आंबा, सीताफळ, रामफळ सर्व झाडे कशी फुलून जात. त्यातल्या त्यात तिला पारिजातकाचं झाड खूप आवडायचं. अंगण भर त्याचा सडा आणि सुवास घरभर. पण आता आजीच्या जाण्यामुळे, त्या पारिजातक च्या झाडाला सुद्धा मोहर येतो का नाही काय माहीत?

वेळेने जरी आज तिला पडद्याआड नेहेले असले तरी ती आमच्याबरोबर आमच्या आठवणीत कायम असणार आहे. गीता मध्ये कृष्ण अर्जुनाला सांगतो की आत्मा अमर आहे. जीवित पणें जसे आपण कपडे बदलतो तसा आत्मा वेळेनुसार शरीर. 

कदाचित काही वर्षांनंतर आम्ही सर्व जन परत त्या काळाच्या पडद्यामागच्या विश्वामध्ये, त्या अजरामर आत्म्याला भेटू. कदाचित परत तोच मायेचा हात पाठी वर फिरेल. कदाचित परत तेच निख्खळ हसू ऐकू येईल. कदाचित परत “लई तरास नाई झाला ना तुला” हे वाक्य परत कानी पडेल. कदाचित


Sharing is Caring!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *