आज अगदी पहाटे पहाटे घर सोडलं. खरं म्हणायचं तर पहाट होण्या अगोदरच घर सोडलेलं होतं. साखर झोपेच्या वेळी मनाला समजवत, राहिलेली झोप आपण विमानामध्ये नक्की पूर्ण करू या आशेमध्ये विमानतळ गाठलं.
सर्व सोपस्कार विमानतळावर पूर्ण करून विमानात बसायला एक तास गेला. पुणे ते बेंगलोर हा जेमतेम एक तासाचा विमानाचा प्रवास. आता उजाडू लागलं होतं आणि न झालेली झोप, डोकं जड करत होती. अशावेळी कमीत कमी खिडकीची बाजू मिळावी अशी अपेक्षा होती. परंतु काही कारणास्तव मधली सीट मिळाली. आता दुसरी अपेक्षा मनात होती की बाजूला कोणी येऊ नये म्हणजे आपल्याला खिडकीमध्ये बसता येईल. परंतु काही वेळातच एक वयस्कर गृहस्थ शांतपणे पेपरचा गुच्छ घेऊन शेजारी येऊन बसले.
त्यांच्या चेहऱ्यावरती एक प्रसन्नता होती. एवढ्या सकाळी सुद्धा प्रसन्न असलेले त्यांचे डोळे चष्म्या मागून पेपर चाळत होते. काही काळ माझं लक्ष खिडकीत जास्त आणि या सद्गृहस्थावर कमी होतं. परंतु त्यांचं व्यक्तिमत्व असं होतं की हे कोणीतरी महत्त्वाची व्यक्ती आहे असं खुणावत होतं.
विमान आकाशात झेपावल आणि हवाई सुंदरी यांनी पेय आणि खाण्याचे पदार्थ देण्याची लगबग सुरू केली.
कॉर्पोरेट ग्राहकांना प्राधान्य दिले जाते, आणि इन्फोसिस कडून मी अनेकदा प्रवास केल्यामुळे मला याबद्दल माहिती होती. माझ्याप्रमाणेच या गृहस्थाला सुद्धा प्राधान्य दिले जात होते. मनात निश्चय केला की कोणत्या कंपनीत आपण काम करता याने चर्चा सुरू करायची.
स्मितहास्य करत ह्या व्यक्तीने बोलायला सुरुवात केली. प्रथम स्वतःबद्दल जास्त न बोलता एका कंपनीचा मालक आहे आणि कामाने बेंगलोरला जात आहे एवढेच बोलले. इन्फोसिस मध्ये आपण काय करता आणि इन्फोसिस याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यामध्ये ते उत्साही होते. माझ्या कंपनी बद्दल सांगितल्यानंतर मी त्यांना सहज विचारलं की तुमच्या कंपनीमध्ये काय प्रॉडक्ट डेव्हलप होते?
त्यांच्या एकंदरीत सफाईदार इंग्लिश संभाषणामुळे आणि त्यांचा फॉर्मल पेहराव – इस्त्री केलेला शर्ट, काळी इस्त्री केलेली पॅन्ट, काळे बूट, हे पाहता मला वाटलं माझ्यासारखाच एखाद्या मोठ्या आयटी कंपनीमध्ये मॅनेजर वगैरे असतील. परंतु माझे अंदाज पूर्ण तोडत, त्यांनी थोडक्यात आपली माहिती दिली. सम्राट चक्की आटा, सम्राट बेसनचे पीठ आणि जेमिनी खाद्यतेल यांचे मालक, हे आहेत श्री प्रकाश पारेख. इतका मोठा माणूस, दोन वाक्यांशिवाय जास्त स्वतः बद्दल न बोलता पुन्हा त्यांनी चर्चा आयटी व्यवसाया कडे वळवली. आयटीमुळे कसे जागतिकीकरण व ऑटोमेशन होते व त्यामुळे व्यवसायाला नवी उंची कशी गाठता येईल येते या विषयाबद्दल, जे मला माहिती होते मी ते त्यांना सांगितले. मी त्यांना विचारले की तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये आयटी वापरून काही ऑटोमेशन केले आहेत का? परंतु त्यांनी एक दुसरी बाजू दाखवली. एका उद्योजकाने केवळ प्रॉफिट च्या मागे न जाता सामाजिक दृष्ट्या सर्वांगीण विकास कसा करता येईल याचे त्यांनी उत्तम उदाहरण दिले. त्यांनी सांगितले की ऑटोमेशन जरूर करता येईल परंतु त्यांनी ऑटोमेशनपेक्षा मानवी श्रमाला प्राधान्य दिले. भारतासारख्या गरीब देशांमध्ये अजूनही अशी लोक आहेत ज्यांना स्किल मजूर म्हणता येणार नाही.भारत हा स्वस्त अकुशल कामगारांचा देश आहे, आणि एका उद्योजकांने ह्या अकुशल कामगारांचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांनी त्यांच्या कंपनी मध्ये कामगारांच्या पॉलिसीज बद्दल माहिती दिली. प्रॉफिट योग्य पद्धतीने कामगारांमध्ये विभागणी करून एक अत्यंत निष्ठावान कामगारांचा संघ त्यांनी तयार केला. कोविड च्या महामारी मध्ये या निष्ठावान कामगारानीच कंपनीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. जेव्हा आपण घरात बसून, कोविडच्या महामारी मध्ये ऑनलाईन ऑर्डर करत होतो, तेव्हा ह्या अशा अनेक कंपन्यांमध्ये कामगार दुपटीने मेहनत करून प्रोडक्शन वाढवत होते.
केवळ स्वतःचा फायदा न पाहता सामाजिक दृष्ट्या जे योग्य आहे, ते करणारा असा हा उद्योजक.
हे पाहता मी त्यांना अपंग व्यक्तींना त्यांच्या व्यवसायात संधी द्यावी व अपंग व्यक्तींना व्यवसाय करण्यास मार्गदर्शन करावे अशी एक विनंती ठेवली. कुतूहलाने त्यांनी सर्व समजून घेतले आणि या गोष्टीला सुद्धा दुजोरा दिला की एका अपंगाची प्रोडक्टिव्हिटी ही कायम नॉर्मल कामगारापेक्षा जास्त असते. त्यांना मी माझी शाळा, महात्मा फुले अपंग प्रतिष्ठान याबद्दल माहिती दिली व आमंत्रण दिले की स्वतः येऊन मुलांना मार्गदर्शन करावे. प्रकाशजींनी चटकन आपला मोबाईल बाहेर काढून माझा नंबर सेव करत, अपंगांच्या सर्वांगीण विकासाबद्दल आपण नक्कीच काहीतरी पावलं उचलू असे सांगितले.
आमच्या चर्चेला उधाण आलेलं असतानाच, विमान बेंगलोर हवाई पट्टी वरती उतरले.
माझ्या शाळेला भेट द्यायचे आणि अपंगांना नोकरी देण्याबद्दल माझी कंपनी पुरेपूर प्रयत्न करेल याचे आश्वासन देत, श्री पारेख यांनी निरोप घेतला.
अशा उत्स्फूर्तदायी व्यक्तिमत्व बरोबर चर्चा केल्यामुळे, सर्व शारीरिक थकवा बाजूला होत दिवसाची सुरुवात आल्हादायक झाली.