मला माहितीये, जवळपास दोन आठवड्याच्या उशिरानंतर मी हा लेख लिहायला बसलोय. मराठी गौरव दिवस हा 27 फेब्रुवारीला होऊनही गेला आणि आज 9 मार्चला मी त्याबद्दल लिहायला बसलो आहे. पण मराठी भाषा ही इतकी गौरवशाली आहे की त्याबद्दल आपण कोणत्याही दिवशी बोलल तर हरकत काय आहे? असं म्हणून 27 फेब्रुवारीच महत्व मी कमी नक्कीच करत नाही. अत्यंत खास कारणामुळे हा दिवस मराठी भाषकांच्या हृदयाजवळचा आहे. का बरं या दिवसाला इतकं अनन्य साधारण महत्त्व? याच दिवशी मराठी गौरव दिवस साजरा करायचं काय कारण?
चला तर मग अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधायला, माझ्याबरोबर या लेखांमध्ये.
27 फेब्रुवारी 1912, हा दिवस उजाडला आणि मराठी साहित्याचा सुवर्णकाळ सुरू झाला. कारण विष्णू वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर. कदाचित हे नाव इतकं परिचय असं वाटत नसेल तर कुसुमाग्रज या नावाचा विचार करावा. हो, ही तीनही नाव एकाच महापुरुषाची.

कुसुमाग्रजांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर असे बदलले गेले. कुसुमाग्रजांना सहा भाऊ आणि कुसुम नावाची एक लहान बहीण होती, एकुलती एक बहीण सर्वांची लाडकी म्हणून कुसुमचे अग्रज म्हणून ‘कुसुमाग्रज’ असे नाव त्यांनी धारण केले.
तसे म्हटले तर त्यांची अनेक नाटक, कविता व कथासंग्रह आहेत ज्यांनी अमलाग्र असा समाजामध्ये बदल घडवला. साहित्य हे समाजाच्या परिवर्तना योग्यच असावं, याच्यावर त्यांचा दृढ निश्चय होता. आपणासर्वास नटसम्राट हे नाव परिचयाचं असेलच. नाना पाटेकर यांनी अभिनय केलेला चित्रपट खरंतर तात्या साहेबांनी लिहिलेल्या नाटकावरती आधारित होता. नटसम्राट या नाटकाने प्रचंड यश मिळवले. समाजात होणाऱ्या वृद्धांची हाल-अपेष्टा इतकी योग्यपणे मांडण्यात आली की बरेच वृद्धांनी आपले मृत्युपत्र बदलल्याचे तात्या साहेबांना पत्राद्वारे कळवले.
त्यांचा जन्म दिवस (२७ फेब्रुवारी) हा मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. ( अनेक वेळा सर्व सामान्य माणसा कडून ‘मराठी भाषा गौरव दिन’ आणि ‘मराठी भाषा दिवस’ याची गफलत केली जाते. ‘मराठी भाषा गौरव दिवस’ (२७ फेब्रुवारी) आणि ‘मराठी राजभाषा दिवस’ (१ मे) हे स्वतंत्र दिवस असून या दिवसाचे स्वतंत्र असे महत्त्व आहे.)
खरं म्हणायचं तर माझा मराठी साहित्याचा प्रवास हा पूल देशपांडे, व पु काळे, द मा मिरासदास, प के आत्रे एवढ्या पुरताच मर्यादित होता. तात्यासाहेबांचे नाव ओळखीचे होते, चित्रपट रुपी त्यांचे काम पाहिलेही होते पण वाचण्याचा योग आला नव्हता. त्यांच्याबद्दल इतके काही कळल्यानंतर मला राहावले नाही व कुसुमाग्रज यांची समिधा या काव्यसंग्रहापासून नव्याने मराठी साहित्याचा आनंद घेण्याची सुरुवात केली आहे. कणा या कवितेनंतर त्यांची खालील कविता ही मला अत्यंत भावलेली आहे.

तात्यासाहेबांच्या साहित्याचा आनंद घेताना मला सारखं एक ठेगणेपण जाणवत होते. तात्यासाहेबांनी ज्याप्रमाणे कविता व कथा लिहिल्या आहेत हे आपण फक्त उपभोग होऊ शकतो. क्वचितही त्यांच्या १% इतकी ही प्रतिभा आपल्याकडे ढुंकूनही पाहणार नाही याचं दुःख होतं. त्यांनी ज्या भाषेत हे सर्व लिहिले आहे ती आपल्याला सहज वाचता येते हेच माझे भाग्य.
असा विचार करत असताना अजून एक विचार मनात डोकवून गेला. मराठी ही इतकी वैविध्यपूर्ण भाषा आहे ज्यामध्ये तात्यासाहेबांसारखे असे अनेक प्रतिभावान लेखक होऊन गेले. अशा भाषेला “मराठी टिकवायची असेल तर” या प्रकारचे सूर आजकल कानी पडतात.
खरंच आपल्यासारख्यांच्या हातात आहे का हो मराठी भाषा वाचवायची? भाषेचं राजकारण सोडा, पण खरंच इतकी सुंदर व प्रबळ असा इतिहास आणि साहित्य असलेली भाषा विलोप पावू शकते का?
जागतिक कारणामुळे आपला सर्वांचा ओढा हा जगातल्या प्रमाण भाषेमध्ये जास्त आहे. जागतिक संस्कृती व जागतिक भाषा जो लवकर समजून घेतो त्याची प्रगती होते अशी आपली एक समजूत आहे. जरी या वस्तुस्थितीमध्ये सत्यता असली तरी एक मात्र आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे की ज्याची मूळ खोल नसतात ती झाड लवकर उखडतात. आपली भाषा व आपली संस्कृती ही आपली मूळ आहेत. आपली मुळ जितक घट्ट असतील तर अशी अनेक जागतिकीकरणाची वादळ आपण सहज परतून लावू.
आणि राहिला प्रश्न मराठी टिकायचा तर..खरंतर एका मराठी नटाच्या भाषणामध्ये मी ऐकलं की मराठी भाषा टिकेलच, तू बोल नाहीतर बोलू नकोस! पण त्या भाषेचा आनंद घ्यायची संधी तुला मिळत आहे तिचा तू कितपत योग्यपणे वापर करतो याचा मात्र विचार कर. जर मराठी भाषेचा आनंद घ्याचा असेल तर मराठी बोल्ली पाहिजे , मराठी साहित्य वाचलं पाहिजे.
मग काय वऱ्हाडी असू दे, कोंकणी असू दे किंवा पुणेरी असू दे, मराठी मध्ये व्यक्त व्हा आणि आनंद लुटा.
व्याकरणाच्या चुकांबद्दल क्षमा असावी … 🙏