साधी भोळी माझी आई – तुला दिलेल्या शुभेच्छा !!

Jul 2021

नर्मदे मैया चा जसा प्रवाह कुठेच खुंटत नाही तसंच तुझं प्रेम अखंड वाहत असते. आज समाजामध्ये आमची ओळख तुझ्या संस्कारामुळेच आहे. देव्हाऱ्यातल्या देवाप्रमाणे तुझा मुर्तीमंत प्रसन्न चेहरा, ह्याच्या सावलीमध्ये मी वाढलो. हे खूप मोठे भाग्य मला लाभले.

आयुष्यातल्या कठीण प्रसंगांना सुद्धा अत्यंत धैर्याने सामोरे जाऊन तू, आमच्यापुढे एक आदर्श ठेवला आहे. जसे नंदादीप च्या प्रकाशाने घर प्रसन्न, सात्विक होऊन जातं त्याप्रमाणे तुझे हास्य, आवाज सर्व घराला प्रफुल्लित करते.

आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने, तुझा एक चांगला शिष्य होऊन एक उत्तम माणूस बनण्याचा प्रतिज्ञा घेतो.

आज जरी आज्जी आपल्यात नसली तरी तुझ्या सावलीतून तिचे प्रेम आमच्या पर्यंत पोहोचते आहे यात मला खूप समाधान आहे.

अशी माझी आई, माझी प्रथम गुरु, तुला त्रिवार वंदन करतो. 🙏🙏🙏


59th वाढदिवसाच्या शुभेच्छा – Year 2021

आई तुझ्याबद्दल काही लिहू असं बराच वेळ विचार करत होतो.

नातवांमध्ये रमणारी, सतत आनंद शोधणारी,

सर्वोच्च दुःखाला हसत हरवणारी, पुस्तकांमध्ये रममान होणारी,

श्रीरामाच्या गजरामध्ये दंग होणारी, अशी आहेस तू, तुझ्याबद्दल काही लिहू असं बराच वेळ विचार करत होतो!

स्वतःचा आनंद किंवा दुःख या गोष्टींना बाजू ठेवून दुसऱ्यांना आनंदाची गरज आहे याची जाणीव ठेवणारी तू,

समज – गैरसमज या संवादाच्या पलीकडे जाऊन माणसातला राम शोधणारी तू,

गुरु प्रमाणे वाट दाखवणारी सुद्धा तूच, तुझ्याबद्दल काय लिहू  मी !!

मुक्तकंठाने कौतुक करणारी किंवा एखाद्याची कटू शब्द निळकंठl प्रमाणे गिळून, पचवणारी तू,

दुसऱ्याला न हसता दुसऱ्या सोबत हसणारी तू, संगीत, कला, नाट्य यांचा योग्य प्रमाणात उपभोग घेऊन, अध्यात्मात वाहणारी तू,

तुझ्याबद्दल काय लिहू  मी !!

आपल्या प्रेमाच्या सावलीने अनोळखी व्यक्तीला आपलंसं करणारी तू,

माणसाची श्रीमंती ही बँकेतल्या अंकांमध्ये न मोजता, त्याच्या भावामध्ये मोजणारी तू,

पराभवाला पचवायचं कसं आणि विजयाला सांभाळायचं कसं हे शिकवणारी तू,

तुझ्याबद्दल काय लिहू  मी !!

प्रयत्न आणि मेहनत याची आराधना करायला शिकवणारी तू,

तू हात पसरलेस तर देण्यासाठी, कडू बोललीस तर सत्यासाठी, स्वप्न पाहिलंच तर ते जिंकण्यासाठी, खाली मान घातलीच तर अवघड वाटा तुडवण्यासाठी, शब्द दिलाच तर पाळण्यासाठी.

तुझ्याबद्दल काय लिहू  मी !!

तू अशी आहेस म्हणून आमच्यावरती समाजामध्ये एक जबाबदार नागरिक महनून राहण्याचे संस्कार झाले

अशा माझ्या आईला उदंड आयुष्य लाभो, तिची नर्मदा परिक्रमा (तिची तीव्र इच्छा आहे म्हणून) निर्विघ्न पूर्ण व्हावी. आयुष्यात जेवढे दुःखाचे अश्रू तिला गिळायला लागले आहेत त्यापेक्षा आई, तुझे उर्वरित आयुष्य आनंदाने नाहून निघावे.

श्रीरामाच्या चरणी अशी प्रार्थना ठेवतो. वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा 


Mother’s day wishes – Year 2021

माझ्यासाठी सतत झटणाऱ्या व प्रत्येक अशक्य गोष्ट शक्य करणाऱ्या अशा माझ्या आई ला, मातृत्व दिनाच्या शुभेच्छा. तिच्याबद्दल काहीही लिहिताना, मला कायम असंच वाटतं की “आरंभ खूप प्रचंड” आहे. कुठून सुरू करावं हाच प्रश्न पडतो. आईला प्रथम गुरू मानला जातो. परंतु ती माझ्यासाठी फक्त गुरूच नाही तर माझी खूप चांगली सवंगडी आहे. या मैत्रीच्या नात्यात मुळे, आमच्यामध्ये कोणतीही भीती नाही. माझ्या अत्यंत शूल्लक अशा शंकांना, अगदी लहान पणा पासून हसत मार्गदर्शन केले. त्यामुळे आयुष्यातली प्रत्येक गोष्ट सखल पणे शिकता आली.

मित्र बनवण्यापासून ते अभ्यासाची शिस्त लावण्यापर्यंत, आयुष्यातले खूप गुण हे तिच्याकडून शिकलो. माझ्या सर्व जवळच्या मित्रांशी स्वतंत्र मैत्री असणारी अशी माझी आई. प्रसंगी बाबांच्या कठोर शिस्तीला उन्हा सारखे सोसून मला सावली मध्ये ठेवणारी, आणि माझ्या प्रत्येक चुकी वरती कठोर शिक्षा देणारी माझी आई. आयुष्याच्या प्रत्येक कठीण प्रसंगाला कणखर कण्याने उभी राहणारी माझी आई. 

कितेक तिच्या साड्या माझ्या सायकली मध्ये अडकून फाटल्या पण तिने माझ्या शिक्षण थांबवले नाही. असे खूप प्रसंग आले ज्यामुळे तिचा प्रवास खरतड झाला. पेण मधला दिवसान दिवस पडणारा पाऊस असो किंवा हडपसर मधले माझे वरच्या floor चे वर्ग आसो. शेवटी परस्थिती ने तिच्या पाषाणआसारख्या निर्धारा पुढे हात टेकले. अभ्यासाबरोबरच, कला, public speaking व अनेक इतर गुणांना वाव दिला, त्या मुळे माझे आयुष सुकर झाले. अश्या अनेक अथक प्रयत्नांचं फळ मला उपभोगायला मिळत आहे. 

मी जेव्हा वेगवेगळ्या कंपनीमध्ये जाऊन माझ्या अपंगत्वारील विजयाबद्दल बोलतो तेव्हा सर्वांना आईच्या कर्तुत्वा वरून सर्वांना भरून येते. आज तिच्या आयुष्याच्या हा प्रवास, अनेक अपंग पालकांना प्रेरणा देऊन जातो. 

तिचं कर्तुत्व असे आहे की प्रत्येक दिवस तिच्यासाठी celebrate करायला हवा.


57th वाढदिवसाच्या शुभेच्छा – Year 2019

आई, 

आज तू ५७ वर्षाची तरुणी झालीस. अगदी लहानपणीच नाही आठवत, पण जसा आठवतंय, माझ्या बहुतांश आठवणीमध्ये तुझा हसरा चेहराच दिसतो. जसा मी मोठा होत गेलो, च्या हसर्‍या चेहर्‍याच्या पडद्या मागील वेदनाही दिसू लागल्या. अगोदर वाटत होतं की तू वेदना विसरून हसतेस, पण हल्ली समजलं की तू वेदनांना हरवून हसतेस.  हनुमाना प्रमाणे  श्रीरामचंद्राच्या भक्तीमध्ये भिजलेल्या आणी रामदासांन प्रमाणे मनावर, मनातल्या विचारानवर आणि शब्दावर प्रभुत्व मिळवलेल्या आईस,  वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

आई ही एक विलक्षण शक्ती असते असा आपण पुस्तकांमध्ये कायम वाचतो. याचा प्रत्यक्ष प्रत्यय मला अनुभवायला मिळाला. स्वभावावर औषध नसते हे जरी खरे असले तरी बाबांचा स्वभावच बदलून तिने औषध शोधण्याचा प्रश्नच मिटवला. 

खवळलेल्या समुद्राच्या लाटा, ज्याप्रमाणे समुद्रातला दीपस्तंभ शांतपणे परतावून लावतो, त्याप्रमाणे आयुष्यातल्या अनेक कठीण प्रसंग तू हाताळलेस. बाबांच्या जाण्याने तयार झालेली पोकळी ही कधीही न भरण्यासारखी आहे. पण त्याची खंत न करता बाबांच्या आठवणी खऱ्या अर्थाने celebrate करतेस. अध्यात्म वाचून आत्मसात करन्या मुळेच ही शक्ती आली असेल.

तुझा शांत स्वभाव आणि अध्यात्माचे प्रभुत्व, यामुळे खूप लोकं तुझ्याशी त्यांच्या आयुष्यातल्या समस्यां बाबत चर्चा करतात. यामुळे तुझा मित्र परिवार वाढतच गेला. तुझी कोमल वाणी आणि स्पष्ट शब्द यामुळे अनेक लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडले आहेत, यामध्ये माझाही समावेश आहे. आज मी जे काही बनू शकलो आहे, ती केवळ तुझ्या कष्टामुळे आणि संस्कारामुळे. “पाय नसले तरी जिभ आहे. जिभेचा योग्य वापर कर आणि हजार पाय उभे राहतील” ह्या एका लहानपणीच्या सल्ल्यामुळे माझं पूर्ण विश्व उभ राहिल. 

तुला तरुणी म्हणण्याचं कारण की या वयात सुद्धा तुझी शिकण्याची जिद्द काही कमी झाली नाही. मोबाईल, इंटरनेट गोष्टींचा वापर केवळ मनोरंजनासाठी न करता, self improvement साठी कसा केला जाईल हे तू कायम पाहतेस. सध्याच्या निराशाजनक परिस्थितीमध्ये सुद्धा, व्यायाम, विपश्यना, योगा या गोष्टींची शिस्त तू जरा सुद्धा मोडून दिली नाहीस. आपले शरीर हे मंदिर आहे आणि आत्मा हा खरा देव, हा तुझा विचार मला सुद्धा व्यायामाची प्रेरणा देणारा आहे.

असा आनंद शोधणारा आत्मा, माझी आई आहे.

शार्दुल च्या मराठी पुस्तकांमध्ये श्यामच्या आई कथेचा उल्लेख आला आणि माझ्या मनात विचार आला. मला वाटले की माझ्या आयुष्यातल्या कर्तृत्वामुळे जर इतिहासने माझ्यासाठी काही ओळींची जागा सोडली, आणि माझी नोंद शोभाचा मुलगा म्हणून झाली, तर काय मज्जा येइल?


 

Sharing is Caring!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *